Sunday 22 July 2018

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

दिनांक :- २२.०७.२०१८


                                                      "मन करा रे प्रसन्न"
                                   (व्यक्तिमत्व विकासाचे सोपे मार्ग या पुस्तकातून)





"एकदा एक विद्वानाने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले की, जो कोणी सर्वश्रेष्ठ सुविचार सांगेल त्याला पाचशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अनेकांनी आप- आपले विचार प्रस्तुत केले. पण बक्षीस कोणाला मिळाले माहित आहे ? 

पुढील विचारला

"मन प्रसन्न हवे, मग झोपडी काय नि राजवाडा काय सारेच सारखे."




मनाची प्रसन्नता हे एक अनमोल धन आहे. प्रसन्नता म्हणजे समाधान आणि समाधान हीच आपली    सर्वश्रेष्ठ  संपत्ती. डेल कार्नेजी यांनी आपल्या एका पुस्तकात म्हंटले आहे की प्रसन्नताच एक अशी वस्तु आहे की जी स्वत:ची हानी न होता दुसऱ्याला दिली जाऊ शकते.

तत्वज्ञ साधु वासवानी तर म्हणतात. "तुम्हाला जर प्रसन्न राहायचे असेल तर इतरांना प्रसन्न करा."

प्रसन्नतेमुळे आपली सर्वांशी मैत्री होते. स्वामी विवेकानंदानी अमेरिकेत अनेक लोक लोहचुंबकाप्रमाणे आपल्याकडे आकर्षित करून घेतले. याचे कारण त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता. दुसऱ्याच्या हृदयात शिरायला प्रसन्नतेसारखे दुसरे धन नाही.

शरीर स्वस्थ व आरोग्यसंपन्न ठेवायला  प्रसन्नतेसारखे औषध नाही. मोठे लोक संकटाचेही स्वागत प्रसन्नतेनेच करतात. संकटाचेही जो प्रसन्नतेने स्वागत करतो त्याच्या संकटाची तीव्रता कमी होते. कुंती ने ही श्री. कृष्णा जवळ संकट दे अशीच मागणी केली. पण संकटे सहन करण्याची शक्तीही मागितली. 




प्रसन्नता ही यशाची गुरुकिल्ली आहे. ध्येयसिद्धीसाठी प्रसन्नता हे प्रत्येकाजवळ असणारे धन आहे. 

प्रसन्नता कशाने प्राप्त होते...?????

उदारता, श्रद्धा, कर्तव्य परायणता, आशावाद, निरपेक्ष वृती, संयम व विनम्रता यांच्याजोगे जीवनात प्रसन्नता येऊ शकते. म्हणुनच तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे:



                                                 "!!!! मन करा रे प्रसन्न !!!!"
                                               "!!!! सर्व सिद्धीचे कारण !!!!"

श्री. आचार्य विनोबा म्हणतात, ज्या ठिकाणी नम्रता नाही, त्या ठिकाणी प्रसन्नता नाही. प्रसन्नता नसेल तर बुद्धीची स्थिरता किंवा मनाची एकाग्रता होत नाही. तेव्हा प्रसन्नता ही एक प्रकारची संजीवनी आहे.


                                          !!!! प्रसन्नतेपुढे सर्व दु:खे जाती झडोनिया  !!!!
                                          !!!! प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे !!!!
                                                                                                          गीताई....

प्रसन्नता एक हास्य- चिकित्सा आहे. हिब्रु भाषेत एक उक्ती आहे की, प्रसन्नता हे कायाकल्प करणारे औषध आहे. एक अनुभवी व वृद्ध गृहस्थाने एका तरुणास आनंदप्राप्तीसाठी लागणाऱ्या दहा गोष्टी लिहावयास सांगितल्या. त्याने यश, कीर्ती, सन्मान अशा अनेक गोष्टी लिहिल्या, त्या अनुभवी गृहस्थाने ती यादी खोडून एकच गोष्ट लिहिली ती म्हणजे "मनाची प्रसन्नता".




फुलाला काटे असतात म्हणुन ओरडण्यापेक्षा काट्याबरोबर फुले ही असतात म्हणुन धन्यता मानली पाहिजे.

आशावादी माणसाला अडचण ही पण संधी वाटते तर निराशावादी माणसाला संधी ही सुद्धा अडचण वाटायला लागते. म्हणुनच आशावाद व विश्वास ही प्रसन्नतेची दोन चाके आहेत. नकारात्मक विचारांचा प्रभाव देखील नकारात्मक असतो. असे विचार मनाच्या शक्तीला दुर्बल करतात व कार्यक्षमतेला बाधक ठरतात. म्हणुनच आपण जे कार्य करतो ते प्रसन्नातापुर्वक केले पाहिजे.

"उन्नतीचा मार्ग म्हणजे परिश्रम व जे परिश्रम करतात आणि कार्य हेच सौंदर्य मानतात तेच महान होतात." ते स्वतः आनंदी असतात व जेथे असतील तेथे आनंद निर्माण करतात." ज्यांच्यामध्ये प्रसन्नता नसते ते दुसऱ्याचा द्वेष करतात. दुसऱ्याची उन्नती त्यांना सहन होत नाही. तेव्हा प्रसन्नता हा सद्गुण असुन सर्वांनी तो अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


प्रसन्न ते बाबत मार्टिन ल्युथर ची एक गोष्ट आहे. 



एकदा तो भयंकर निराश झाला होता. निराश्याच्या पोटी त्याच्या घरचे वातावरण पण उदास झाले होते. त्याच्या पत्नीने त्याला खुप धीर देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ ! शेवटी तिला एक युक्ती सुचली ती एके दिवशी काळे कपडे घालुन शोक करू लागली.

हे मार्टिन ने पहिले आणि त्याने त्याच्या पत्नीला विचारले की कोण मरण पावले ...???
यावर त्याची पत्नी म्हणाली: "तुम्हाला माहित नाही का..? की आज सकाळी ईश्वराचे निधन झाले."

मुर्खासारखे, वेड्यासारखे काहीही बरळू नकोस ईश्वर कधी मारतो का...?? तो अमर आहे. मार्टिन म्हणाला.

पत्नी म्हणाली: आपण म्हणाले ते नाकी खरे आहे का..???
मार्टिन : तुला नाकी संशय येतो तरी कसा..??? "मी सांगतो ते अगदी सत्य आहे."
पत्नी: मग जर असे आहे तर तुमचा चेहरा असा कसा...? अशी तुमची कोणती काळजी आहे जी ईश्वरही दूर करू शकणार नाही..? कोंडी फुटली आणि ल्युथर मनापासुन हसला पत्नीचे म्हणणे त्याला एकदम पटले.   


"प्रसन्नता ही जीवनाची सवय बनवा म्हणजे मग निराशेच्या ढगातूनही तुम्हाला आशेचे किरण दिसू लागतील." 

तेव्हा याचा शेवट मी असा करेन:



"प्रसन्नता आपण जितकी मिळवण्याचा प्रयत्न करू तितकी ती मिळत जाते. याचे कारण प्रसन्नता ही बाहेर शोधायची वस्तु नाही. भौतिक सुखांवर ती अवलंबून आहे. त्यामुळे मन उदास असेल तर सर्व उदास वाटायला लागेल आणि मन प्रसंन्न असेल तर सर्व प्रसंन्न वाटायला लागेल. आणि हो जी गोष्ट करण्याने तुम्हाला आनंद मिळत असेल ती गोष्ट आपण जरूर करायला हवी तिला कोणाच्याही सांगण्यावरून मध्ये अध्ये थांबवु नये. शेवटी मनाचा आनंद महत्वाचा कारण मन प्रसन्न तर सार काही प्रसन्न.