Saturday 21 April 2018

थेंबे थेंबे तळे साचे सुखाचा मुलमंत्र वाचाच एकदा ...

दिनांक :- २१.०४.२०१८

थेंबे थेंबे तळे साचे सुखाचा मुलमंत्र वाचाच एकदा ...
काही छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात:-



कथा नंबर एक:-

"सुप्रसिद्ध कारखानदार हेन्री फोर्ड" यांच्या घरातील भिंतीवर एक फोटो होता, त्यात ते एका गरीब व्यक्तीला आलिंगन देत आहेत असे दृश्य होते. बरेच दिवस हा फोटो त्यांच्या घरात पाहिल्यानंतर एक दिवस त्यांच्या चिटणीसाने त्यांना सर ही फोटोतील व्यक्ती कोण आहे ? असे विचारले.

त्यावर हेन्री फोर्ड म्हणाले हा माजा वर्गमित्र आहे. 

यावर आश्चर्य चकित होऊन चिटणीसाने पुन्हा विचारले... मग सर दोघांमध्ये एवढा फरक कसा..??

त्यावर हेन्री फोर्ड म्हणाले "आम्ही दोघांनी कमाईस एकत्रच सुरुवात केली. त्याने मात्र कमाई पेक्षा जास्त खर्च करायला सुरुवात केली. तर मी त्याच दिवसापासून "थोडी-थोडी बचत करायला सुरुवात केली." 

आज साध्या असेच एक उदाहरण आपल्याला आपल्या भारत देशात पाहायला मिळते. भारताचा लिटील मास्टर सचिन तेंदुलकर आणि एक उत्कृष्ट क्रिकेट पटू न बनू शकलेला त्याचाच एक वर्गमित्र विनोद कांबळी. दोघेही एकाच शाळेतील, एकाच वर्गातील दोघांचीही क्रिकेट उत्तम, मग असे काय झाले की विनोद कांबळी हा क्रिकेट पासुन दूर गेला....

एक वेळ तर अशी होती की त्याच्याकडे घर असुन सुद्धा घराचा मेंटेनन्स भरायला पैसे नव्हते आणि याउलट सचिन हा उत्तम क्रिकेट खेळतच गेला श्रीमंत तर झालाच पण प्रामाणिक पणा आणि नम्रपणाने त्याने सर्वांना आपलेसे केले. काहीजण तर असेही म्हणतात की विनोद कांबळी हा सचिन पेक्षा उत्तम क्रिकेट खेळायचा, विनोदही भारता साठी क्रिकेट खेळला पण प्रचंड ग्ल्यामर, पैसा पटकन आलेली श्रीमंती याने तो भुलला त्याला ते टिकवता आले नाही. अय्याशी, एशाराम अश्याने क्रिकेट पासुन तो दूर गेला आणि दोन मित्रांमध्ये खुप अंतर निर्माण झाले.

सचिन ने त्याला मदत केलेही पण त्याचीही त्याने जाणीव नाही ठेवली. असो हा एक भाग...  पण आज सचिन क्रिकेट विश्वातून निवृत्त होऊनही सर्वांच्या मना मना मध्ये बसलेला आहे आणि तो शेवट पर्यंत तसाच राहील.  

कथा नंबर दोन :- 

अमेरिकेतील एक धनाढ्य श्री. रॉकफेलर हे एका हॉटेलमध्ये स्वस्त खोल्यांची चौकशी करत होते, 
तेव्हा हॉटेल चा मालक त्यांना म्हणाला, "आपल्या कंपनीमधील कारकुन सुद्धा आमच्या हॉटेलमध्ये महागड्या खोल्या घेऊन राहतात" यावर श्री. रॉकफेलर यांनी हॉटेल मालकाला म्हणुनच ते गरीब राहिले आहेत असे तत्काळ उत्तर दिले. 

यशस्वी उद्योजक कार्नेजी म्हणतात "सुखाचा व समृद्धीचा मुलमंत्र म्हणजे बचतीची सवय, पैसा, यश व स्वातंत्र्य या तिन्ही गोष्टी मिळवणे एकवेळ सोपे असते."

"थेंबे थेंबे तळे साचे...बचत से बरकत"... याचा विसर पडता कामा नये. 

समजा एखाद्या देशाची संख्या ८० कोटी आहे, त्या देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्येक दिवशी केवळ एक पैसा बचत करण्याचे ठरवले तरी महिन्याभरात ही रक्कम २४ कोटी तर वर्षा भरात ही रक्कम २८८ कोटी रुपये इतकी होईल. त्या देशाचा आर्थिक कायाकल्प घडून येईल.  

कथा नंबर तीन :-

"विश्वविख्यात कुबेर श्री. रॉकफेलर एकदा आपल्या तेल कारखान्यातून हिंडत होते. असेच फिरत असताना एका यंत्राजवळ ते थांबले. हे यंत्र तेलाच्या पिंपाची झाकणे सील करण्याचे काम करत होते. त्यासाठी यंत्रातुन प्रत्येक झाकणासाठी ४० थेंब रसायन वापरले जात होते, त्यांना ते थोडेशे जास्त वाटले, म्हणुन त्यांनी फोरमन ला बोलवले व झाकण बंद करण्यासाठी किती थेंबाची आवश्यकता आहे ते विचारले, त्याला नीट सांगता आले नाही. तेव्हा श्री रॉकफेलर यांनी स्वतः अभ्यास करून ३९ थेंबात हे काम होऊ शकेल असा निष्कर्ष काढला. त्याप्रमाणे त्यांनी ३९ थेंबच वापरण्याचे आदेश दिले. या एका थेंबाच्या बचतीतुन कारखान्याचे प्रतीवर्षी ८ लाख डॉलर्स वाचु लागले.   

कथा नंबर चार:-

"बाबा कैलाशनाथ एक सत्व पुरुष होते, आपल्या गावात एक देऊळ बांधावे असे त्यांना वाटले, गावातील प्रत्येक माणसांकडून त्यांनी १-१ पैसा मदत म्हणुन गोळा केला, आणि आज ते देवालय १ पैसा देवालय म्हणुन प्रसिद्ध आहे. याच पद्धतीने त्यांनी २ पैसा विद्यालय बांधून काढले," अशी आहे बचतीची किमया...

कोणी एका लेखकाने असे म्हंटले आहे की, 

"आकाशातील सर्वात उंच जागेवर बचत बँक हे शब्द फक्त 'दोन शब्द' सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावेत. अल्पबचत म्हणजे केवळ धनसंचय नव्हे, तर फालतू आणि वाईट सवयींवरील खर्च यांना रजा देणे होय." 



कथा नंबर पाच:- 

" एकदा पंडीत मदनमोहन मालवीय बनारस विद्यापीठासाठी देणगी मागण्यासाठी म्हणुन एका श्रीमंत शेटजींकडे गेले. त्याचवेळी ते शेटजी आपल्या धाकट्या मुलाला काडीपेटीतील काड्या वाया घालवण्या वरून रागावत होते.

यावर हा चिक्कु गृहस्थ आपल्याला काय मदत देणार..? असा विचार पंडीत मालवीय यांच्या मनात येऊन गेला. 

थोड्यावेळाने शेटजींने पंडीत मालवीय यांना काय काम आहे असे विचारले, तेव्हा भीत भीत मालवीय म्हणाले "बनारस विद्यापीठासाठी (त्याच्या स्थापनेसाठी) काही देणगी आपणाकडून घ्यावी म्हणुन आलो होतो. परंतु परत केव्हा तरी येतो असे म्हणुन पंडीत निघायला लागले, यावर शेटजींनी त्यांना थांबवले व आपल्या मुलास चेकबुक आणायला सांगितले.

चेकबुक आणल्यानंतर त्यांनी आपल्या खात्यातुन "पाच हजार" रुपयांचा धनादेश पंडीत मालवीय यांच्या हातात दिला. 

त्यांची ती उदार देणगी पाहुन पंडीत मालवीय यांना राहवले नाही व त्यांनी शेटजींनी विचारले की आत्ताच तुम्ही आपल्या मुलाला काडीपेटीतील काड्या वाया घालवण्यावरून ओरडत होतात. चेक देण्याची आपली ही वृत्ती पूर्वीच्या वृत्तीशी विसंगत नाही का वाटत...? त्यावर शेटजी हसत हसत उदगारले, 

"काटकसर म्हणजे चिक्कु पणा नव्हे, तर योग्य कारणासाठी योग्य ठिकाणी योग्य पैसा खर्च करणे होय."

पंडीत मालवीय त्यांच्याकडे बघतच राहिले त्या दिवशी ते आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकले. की...

"शुल्लक गोष्टीतुन जे पुर्णत्व प्राप्त होते ते कधीच पुर्ण नसते." पैशांचे रक्षण आपण केले तो आपले रक्षण करतो."

                                                  !! "अर्थो रक्षति रक्षित:" !!                    

ब्रेन्जामीन फ्रॅक्लीन म्हणतात, "आपण आपल्या उत्प्नाना पेक्षा कमी खर्च करत असाल तर खुशाल असे समजा की आपल्याजवळ पारसमणी आहे." तारुण्यात बहुतेक लोक चैन, एषाराम व उधळपट्टी करतात. बचत, काटकसर या शब्दांची टवाळी करतात, याउलट विचारी आणि सयंमी माणसाचे वर्णन कसे असते ते पहा.

      
कथा नंबर सहा :-

"एका माणसाला सोन्याचे घड्याळ विकत घेण्याची इच्छा होती. तो आपल्या दुपारच्या जेवणावर ५० सेंट खर्च करीत असे. त्याने २५ सेंट खर्च करण्याचा संकल्प केला. ६ महिन्यात त्याच्याकडे घड्याळ खरेदी करण्याइतपत रक्कम जमा झाली, तेव्हा मित्राने त्याला विचारले  की अरे पैसे तर जमा केलेस मग तू अजुन तू घड्याळ का खरेदी केले नाहीस..?

यावर तो म्हणाला आत्ता माज्या मनात एक वेगळाच विचार चालु आहे. जर मी ५० सेंट एवजी २५ सेंट मध्येच माजा भोजनाचा प्रबंध करू शकतो तर सोन्याचे घड्याळ न घेताही माझे काम चालु शकते. त्यामुळे मी ही केलेली बचत माज्या भविष्यकालीन ऐश्वर्याची आधारशीला ठरणार आहे. मी आत्ता या बचतीतून सुंदर वास्तु बांधणार आहे."

कथा नंबर सात:-

ब्रेन्जामीन फ्रॅक्लीनच्या दुकानासमोर एक मनुष्य बराच  वेळ फालतु चौकशी करत हिंडत होता, शेवटी त्याने विचारले की या पुस्तकाची किमंत काय..?? विक्रेता म्हणाला आहे, १ डॉलर, "पण तुम्हाला पडतील २ डॉलर, " त्यावर तो म्हणाला तुज्या मालकांना बोलव मी त्यांची भेट घेऊ इच्छितो." 

यावर श्री. फ्रॅक्लीन आपले काम सोडून आले. ग्राहकाने त्यांनाही विचारले की आपण हे पुस्तक कमीत कमी केवढ्याला द्याल..?"

  
ब्रेन्जामीन फ्रॅक्लीन म्हणाले ३ डॉलर, 

मनुष्य म्हणाला "पण आत्ताच आपल्या नोकराने किमंत दोन डॉलर सांगितली." 

बरोबर आहे आपण त्याचा जो वेळ घेतला त्याचा त्याने १ डॉलर ज्यादा सांगितला आणि माज्या वेळेबद्दल १ डॉलर. तो तरुण काय समजायचा ते समजला...


 शेवटची गोष्ट :-                                   

"एकदा एक राजा बुद्धिबळ खेळत होता. एक शेतकरी त्याच्याकडे मदत मागायला आला. राजा म्हणाला बोल किती पैसे देऊ ..? त्यावर तो चतुर शेतकरी म्हणाला "बुद्धिबळाच्या पहिल्या घरावर एक रुपया, दुसऱ्या घरावर त्याच्या दुप्पट, तिसऱ्या घरावर दुसऱ्याच्या दुप्पट अशा प्रकारे ६४ व्या घरावर पैसे ठेवा व मला द्या." राजाला वाटले काय किरकोळ मागणी आहे," परंतु यावर राजाने अंमल केले असता त्याचा संपुर्ण खजिना रिकामा झाला तरी तो शेतकऱ्याची मागणी पुर्ण करू शकला नाही."

विचार करा आणि लक्षात ठेवा. 


                                        "वेळ किवां पैसा विनाकारण खर्च करणे 
                                       म्हणजे दिलेले जीवन व्यर्थ घालवणे होय."

"जीवनामध्ये सुख व समृद्धीच्या मार्गावरून तुम्हाला चालायचे असेल तर थेंबे थेंबे तळे साचे... हा सुखाचा मुलमंत्र लक्षात ठेवा.


छोट्या छोट्या गोष्टींनीच मोठी मोठी कार्ये पार पडतात, तेव्हा लक्षात ठेवा परमाणु पासुनच परमाणु बॉम्ब बनतो.