Thursday 30 July 2020

कावळ्याची गोष्ट माणुसकी शिकवणारी


कावळ्याची गोष्ट माणुसकी शिकवणारी




सुंदर बोधकथा आहे,

आवडल्यास
इतरांनाही सांगावी अशी .....

एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.
कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन
पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही.बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"

वडील कावळा म्हणाला "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू
लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे.
वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे
तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल." मुलगा कावळा "होय" म्हणाला.
त्यानंतर वडील कावळ्याने
मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात
घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला,
तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस
आणले आहे. असले खाणे मला नको."
वडील कावळा म्हणाला, "थांब,
तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग
तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ. तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते
सुद्धा माणसाचे."
मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ?
पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून
आकाशात उडाला आणि त्याने
तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.

मग तो झाडावर येवून बसला.
वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"

थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.

फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत
होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.

आमच्या धर्माचा अपमान
झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात
होते.

खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे
होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा..

गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.
या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.
आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते.

कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला,
"बाबा, हे असेच नेहमी होते का?
आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"

कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."
इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून
गेले.

No comments:

Post a Comment