Sunday, 29 May 2022

प्राचीन केदारनाथ मंदिर - ४०० वर्ष बर्फाखाली दडलेले - प्रलयाने घेरलेले आणि तरीही स्थिर उभे असलेले हे मंदिर आणि त्याचे न उलगडलेले कोडे

 केदारनाथ मंदिर - अतिशय प्राचीन - शिवशंकर - महादेव यांच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक उत्तराखंड मध्ये शिरावलेले- ४०० वर्ष्याहून अधिक काळ बर्फाखाली गाढले गेलेले आणि तरीही बांधकाम त्याचा पाया, साचा न ढळलेले असे हे अतिशय जुने प्राचीन मंदिर- येथे सर्व भाविकांची गर्दी हि कायम - जून २०१३ मध्ये आलेल्या प्रलया नंतरही अगदी दिमाखात उभे असलेले हे मंदिर. यावर आधारित २०१८ मध्ये केदारनाथ मुव्ही सुद्धा येऊन गेला. तेव्हा या मंदिराविषयी अलीकडेच वाचण्यात आलेला हा लेख पुन्हा एकदा आपल्यासाठी मी माज्या ब्लॉग वर प्रसिद्ध करत आहे.

 



केदारनाथ मंदीराच निर्माण कोणी केल ह्या बाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवापासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. केदारनाथ मंदिर साधारण ८ व्या शतकात बांधल गेल असाव अस आजच विज्ञान सांगते. म्हणजे नाही म्हटल तरी हे मंदिर कमीत कमी १२०० वर्ष अस्तित्वात आहे. केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फुट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फुट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अश्या तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. ह्या क्षेत्रात मंदाकिनी नदीच राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अश्या प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती प्रचंड अभ्यास केला गेला असेल. 



केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभ आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अश्या ठिकाणी त्याच निर्माण का केल गेल असाव? त्याशिवाय १००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कस उभ राहील असेल? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होत तर पृथ्वीवरच्या एका छोट्या आईस एज कालखंडाला हे मंदिर समोर गेल असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडल गेल असाव व त्याची शहनिषा करण्यासाठी वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडूनने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर लिग्नोम्याटीक डेटिंग ही टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे दगडांच आयुष्य ओळखण्यासाठी केल जाते. ह्या टेस्ट मध्ये अस स्पष्ट दिसून आल की साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडल गेल होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही. 



२०१३ साल केदारनाथ इकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे सरासरी पेक्षा ३७५% जास्त पाउस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल ५७४८ लोकांचा जीव गेला. ४२०० गावाचं नुकसान झाल. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्ती लोकांना भारतीय वायू सेनेने एअर लिफ्ट केल. सगळाच्या सगळ वाहून गेल पण ह्या प्रचंड अश्या प्रलयात केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला थोडा धक्कापण लागला नाही.
 अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मते ह्या प्रलयानंतर सुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चर च ऑडीट मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. आय.आय. टी. मद्रास ने मंदिरावर एन.डी.टी. टेस्टिंग करून बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झाल आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे. दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातल सगळ वाहून जाते. एकही वास्तु उभी रहात नाही. तिकडे हे मंदिर दिमाखात उभ आहे आणि नुसत उभ नाही तर अगदी मजबुत आहे. ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधल गेल आहे, ज्या जागेची निवड केली गेली आहे, ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभ राहू शकल आहे अस आजच विज्ञान सांगते आहे. 


हे मंदिर उभारताना उत्तर – दक्षिण अस बांधल गेल आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर ही पूर्व – पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधल गेल आहे. ह्यातील जाणकारांच्या मते जर मंदिर पूर्व- पश्चिम अस असत. तर आधीच नष्ट झाल असत. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच. पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. त्यामुळेच वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रोपर्टीज मध्ये फरक झालेला नाही. त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंट वर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड पाठीमागच्या घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सगळ काही आपल्यासोबत वाहून नेल पण मंदिर आणि मंदिरात शरण घेतलेले लोक सुरक्षित राहिले. ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअर लिफ्ट केल होत. 



श्रद्धेवर विश्वास ठेवावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाच मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. टायट्यानिक बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना एन.डी.टी. टेस्टिंग आणि तपमान कस सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजल. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याच ज्वलंत उदहरण नाही का? काही महिने पावसात, काही बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून उन, वारा, पाउस ह्यांना पुरून उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ मीटर वर ८५ फुट उंच, १८७ फुट लांबीच, ८० मीटर लांबीच मंदिर उभारताना त्याला तब्बल १२ फुटाची जाड भिंत आणि ६ फुटाच्या उंच प्लॅटफॉर्मची मजबुती देताना किती प्रचंड विज्ञान वापरल असेल ह्याचा विचार केला तरी आपण स्तिमित होऊ. आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने १२ ज्योतिर्लिंग पेकी सगळ्यात उंचीवरच असा मान मिळवणार केदारनाथ च्या वैज्ञानिक बांधणीपुढे मी नतमस्तक.     

Sunday, 15 May 2022

लक्ष्मी देवीचा श्राप आणि आळस व कंटाळा यांची एक रंजक कथा

 

कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का..? कि आपल्याला कधी कधी कामाचा, काहीही न करण्याचा खूप कंटाळा आणि आळस येतो. काहीही आणि कोणतेही काम करावेसे वाटत नाही. Life becomes  boaring. पण हे आळस आणि कंटाळा नक्की कोण आहेत. ते कसे दिसतात यांचा काही कुठे उल्लेख आहे का... तर या संदर्भात माज्या पप्पांनी त्यांच्या एका जुन्या वहिती १९९५ साली लिहिलेली एक मजेशीर फार फार जुनी अशी दंत कथा माज्या हल्ली वाचनात आली ती मी येथे आपल्याला ही वाचण्याची संधी देत आहे.  


खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे अपराजित नावाचा एक असूर होता. तो अतिशय पराक्रमी होता. कुणीही त्याला पराजित करू शकणार नाही असा वर त्यान प्रत्यक्ष भगवान शंकराकडून मिळवला होता. आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यानं पृथ्वी तर जिंकलीच, पण लवकरच त्याच लक्ष स्वर्गाकडे वळलं. आता त्याला स्वर्गाचं राज्यही हवंस वाटू लागलं. त्याला देवांचा राजा बनायच होत. 


स्वर्गावर वारंवार हल्ले चढवायला त्यानं सुरुवात केली. भगवान शंकराच्या वरामुळे अजिंक्य बनलेला तो राक्षस देवांना वरचढ ठरू लागला. शेवटी सारे देवगण श्रीविष्णूकडे आले. 


"देवाधिदेव, अपराजित राक्षसानं आमच जगण कठीण केलं आहे. भगवान शंकराच्या वरामुळे तो अजिंक्य ठरला आहे." सर्व देव म्हणाले, "त्याचा ताबडतोब काहीतरी बंदोबस्त करायला हवा, नाहीतर उद्या तो येथे विष्णुलोकावर चढाई करायलासुद्धा कमी करणार नाही." नारदमुनी म्हणाले. 


भगवान विष्णू झोपेतून नुकतेच जागे झाले होते. अजूनही त्यांच्यावर निद्रादेवीचा अमल होता. त्यांनी एक भली थोरली जांभई दिली आणि......... 


                त्या जांभईमधून दोन चमत्कारिक प्राणी बाहेर पडले. अगदी काळाकुट्ट रंग, फताडे पाय, बटबटीत डोळे आणि अतिशय गरीब भित्रा चेहरा !. 


"हे दोघ अपराजित राक्षसावर विजय मिळवतील." श्रीविष्णू म्हणाले. " तुमचं संकट हे दूर करतील." 


"हे दोघे ? हे अशक्त आणि विचित्र प्राणी ? अपराजित राक्षसावर विजय मिळवणार ?" देवांनी आश्चर्यान विचारलं, कोण आहेत हे ?''


   "आळस आणि कंटाळा !" भगवान विष्णूंनी हसत उत्तर दिले. " तुमची शस्त्र, अस्त्र, शौर्य, जे करू शकणार नाहीत ते हे दोघ नक्कीच करू शकतील."



   दोघांनी भगवान विष्णूंना नमस्कार केला. " भगवान आमचं हे रूप.. काळा रंग, बटबटीत डोळे, फताडे पाय... यांच्यामुळे राक्षसगण आम्हास जवळ करणार नाहीत."आळस म्हणाला. 


   " तथास्तु ! तुम्हाला सुंदर रूप मिळेल इतकेच नव्हे. तर तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही अदृश्य देखील होऊ शकाल. जा. यशस्वी होऊन या !" भगवान विष्णूंनी त्यांना वरदान दिले.


अतिशय देखणं रूप मिळालेले आळस आणि कंटाळा हळूच राक्षस सेनेत शिरले. त्यांच्या रूपावर, गोड बोलण्यावर बेहद्द खूष झालेले सैनिक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागले. 


"तुम्ही काम करू नका !" आळस म्हणे. " काम करून काय मिळणार आहे ? शरीराला त्रास फक्त."


कंटाळा म्हणे, " आमच्याकडे बघा आम्ही कसे सुंदर आहोत ! गोरापान रंग ! सुंदर डोळे, कुरळे, काळेभोर केस ! तुमच्यासारख उन्हातान्हात फिरत असतो तर आम्ही काळे, आक्राळ, विक्राळ झालो असतो. तुम्हीसुद्धा आराम करा, आरामानं शरीर सुखी आणि सुंदर बनतं."


सारी राक्षस सेना हळूहळू आळस आणि कंटाळा यांच्या नादी लागली. त्यांच गोड गोड बोलणं त्यांना ऐकायला आवडे, फार काय प्रत्यक्ष अपराजित राक्षसाने बोलावलं तरी ते सांगत, "आता नको, नंतर येऊ, आमच्याकडं आळस आलाय आणि कंटाळापण आलाय."


अपराजित राक्षसाला या गोष्टीच आश्चर्य वाटू लागलं, प्रत्यक्ष राजाची आज्ञा पाळायला दुर्लक्ष करतात हे सैनिक ? केवळ त्या दोघांमुळे ? कोण आहेत हे आळस आणि कंटाळा ?


"आळस आणि कंटाळा यांना बोलावून आणा !" अपराजित राक्षसानं हुकूम दिला. ते दोघेही राक्षस राजासमोर हजर झाले. त्यांना पाहून, त्यांच बोलणं ऐकून राजा इतका खूष झाला, कि त्यान त्यांना आमच्या आमच्या महालात ठेवून घेतलं. 


      लवकरच राक्षस सेनेत आळस आणि कंटाळ्यानं धुमाकूळ घातला. आळसामुळं कुणी काहीही करेनासं झालं, कंटाळ्यानं तर सगळ्यांनाच आपल्या ताब्यात घेतलं, शस्त्र, अस्त्र, गंजली, लढाई करायचंसुद्धा सैनिक विसरून गेल. आणि अचानक देवसेनेने हल्ला चढवला, अपराजित राक्षस राजाला देवसेनेने बंदी बनवलं. देवलोकांवरच संकट दूर झालं. सर्वत्र आनंदीआनंद झाला. आळस आणि कंटाळा यांनी जी कामगिरी केली होती त्याचे सर्वत्र कौतुक होऊ लागल. 


      पण याचा परिणाम उलटाच झाला. आळस आणि कंटाळा स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. जी गोष्ट देवांना जमली नाही ती आपण केली याचा त्यांना गर्व झाला. आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतोअसं त्यांना वाटू लागलं. आपण खरं म्हणजे देवाहुनही श्रेष्ठ आहोत असा त्यांचा समज झाला. 


    " हे देव अमृत पितात. त्यामुळे ते अमर झाले आहेत. आपणही अमृत प्यायला हवं, आपल्यालाही अमरत्व मिळेल. मग आपल्याला कोणीही काहीही करू शकणार नाही." आळस म्हणाला. 


     "पण आपल्याला अमृत मिळणार कसं ? ते तर देवी लक्ष्मीच्या ताब्यात असत." कंटाळा म्हणाला. " 


     "अं, त्यात काय आपल्याला अदृश्य पण होता येत. आपण अदृश्य राहून अमृत पिऊया .... !" आळस म्हणाला.  


     आणि दोघेही लक्ष्मीदेवीच्या महालात शिरले, अमृत कलशामधून अमृत काढून दोघेही अमृत पिऊ लागले. त्याच क्षणी देवीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. 


     "कोण आहे ते अमृत कलशापाशी तिन विचारलं.. ?

  

    दोघांनीही उत्तर दिले नाही, कि ते प्रकटही झाले नाहीत. 


   क्षणातच देवी लक्ष्मीनं त्यांना ओळखलं. " आळस आणि कंटाळा मी तुम्हा दोघांनाही ओळखलं आहे ताबडतोब प्रकट व्हा !" ती म्हणाली. 


 तरीही दोघंजण अदृश्यच राहिले. तास देवीचा संताप वाढला. " प्रत्यक्ष माज्या ताब्यात असलेल्या अमृत कलशातील अमृत तुम्ही प्यायलात. मी दिलेली आज्ञा तुम्ही पाळली नाहीत." देवी संतापानं म्हणाली. " यानंतर तुम्ही स्वर्गलोकात राहू शकणार नाहीतआणि यापुढं तुम्हाला कधीही दृश्य स्वरूपात येत येणार नाही. तुम्ही कायम अदृश्य रहाल." असा देवीने त्यांना शाप दिला. 

  

    आणि आळस आणि व कंटाळा मानवलोकात पृथ्वीवर आले. अमृत प्यायल्यामुळे ते अमर झाले आहेत खरे पण त्या अमरत्वाचा त्यांना काहीही उपयोग झाला नाही ते कोणालाही दिसूच शकत नाहीत. 


मात्र जिथं आळस आणि कंटाळा असतील तेथे देवी लक्ष्मी त्यांना बरोबर ओळखते आणि जिथं ते दोघे असतील त्या घरातून ती बाहेर पडते. आळस व कंटाळा मात्र लक्ष्मीला शोधत घराघरात हिंडत आहेत. त्यांना वाटत कधीतरी ती आपल्याला क्षमा करेल आणि आपण दृश्य स्वरूपात येऊ. 


 पण लक्ष्मीनं स्पष्टच सांगितलं आहे, " आळस आणि कंटाळा यांना क्षमा नाही. जिथं ते आहेत तिथं मी नाही." 


                                 "समाप्त"  

                                                                        - भालचंद्र केशव जगताप (माझे बाबा)

                                                                                                     १२.०२.१९९५

Saturday, 14 May 2022

नामस्मरणाचे महत्व

 

 



विचार - सकारात्मक, आचार (आचरण) - शुद्ध, आहार - सात्विक व विहार सत्संग (चांगल्या लोकांची संगत) या चार गोष्टी जर माणसाने आचरणात आणल्या, तर त्याच जीवन आनंदी होईल. पण हे वाटत तेवढं सोपं नाही आणि हे जर सोपं करायचं असेल तर आपण थोर संतांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मनिष्ठेला अग्रस्थान दिले आहे. त्यासाठी तुम्हाला बुद्धीचा वापर करणे अग्रेसर आहे. 

 

बुद्धी हे आत्मा व जीव यांच्यातील दुवा आहे. सुख-दुःख, पाप-पुण्य, खरे-खोटे, यांचा निवडा करणे हे बुद्धीचे काम आहे म्हणून आपण परमेश्वराला नेहमी म्हणत असतो 


                                  " देवा मला सद्बुद्धी दे "

 

बुद्धी, मन आणि शरीर एकरूप झाल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही. मन हे चंचल असते ते कुठे वाहत जाईल ते सांगता येणार नाही, म्हणून त्याला सन्मार्गाकडे वळविले पाहिजे. बुद्धीच्या स्थैर्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. भक्ती ही अंतःकरणापासून केली पाहिजे. भजन-पूजन कितीही केले पण जर त्याला अध्यात्माची जोड नसेल तर ते वायफळ जाते. अध्यात्मामुळे मनुष्याच्या कर्माला डोळसपणा येतो त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते. तो मायाजालातून मुक्त होतो आणि परमेश्वराला एकरूप होतो.

ज्ञान आणि भक्ती कशी आत्मसात करावी हे ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायात स्पष्ट केले आहे. ज्ञानाची लक्षणे ज्ञात झाली कि, मन परमेश्वर चरणी आपोआप लीन होते. तो नामस्मरणात रमतो त्याला परमेश्वर प्राप्ती चा सुलभ मार्ग सापडतो. त्यासाठी हिमालयात तप करायची गरज नाही किंवा चारधाम यात्रा करण्याची गरज भासत नाही, त्याला एकाच ओढ असते ती पंढरपुरची : 

           !! जेव्हा नसते चराचर !! तेव्हा होते पंढरपूर !!

        !!  जेव्हा नव्हत्या गंगा यमुना !! तेव्हा होती चंद्रभागा !!   


हरिनामाच्या उच्चारामुळे जे पुण्य लाभते त्याची गणना होत नाही. त्याच्या दारात क्षणभर जरी उभे राहिलात तरी त्याला मुक्ती मिळते. 


!! देवाचिये दारी उभा क्षणभरी !! तेणे मुक्तिचारी साधिलिया !! 

!! हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी !!

!! असोनी संसारी जीव्हे वेगु करी !! वेदशास्त्र उभारी बाह्य सदा !!

!! ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणे !! द्वारकेचे राणे पांडवां घरी !!  


नामस्मरण हे भक्ती करण्याचे सोपे साधन आहे; कारण नामस्मरण हे नित्य कर्म साधताना साधता येते. त्याला वेळ व काळाचे नियम नाहीत. त्यासाठी तासंतास मंदिरात बसावे लागत नाही, पण याचा अर्थ असा होत नाही कि मंदिरात जाऊच नये. मंदिरात आरती, भजन, कीर्तन असे उपक्रम चालूच असतात. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. मनाचा चंचलपणा कमी होऊ लागतो. काम - क्रोध - लोभापासून ते दूर जाऊ लागते. सर्व व्यसनांना ते दूर लोटते आणि याचा परिणाम निश्चितच शरीरावर होतो. माणसात बदल होऊ लागतो. सर्वांविषयी मनात प्रेमभावना निर्माण होते. समाजात प्रतिष्ठा लाभू लागते. सत्संगामुळे आणि वाचनामुळे बुद्धी वृद्धिगंत होते. तिचा विस्तार आकाशाएवढा होतो आणि विचार करणायचा दृष्टीकोनच बदलून जातो, सृष्टीचे खरे सौदंर्य जे आधी कधी पाहू शकत नव्हता ते पाहू शकतो विश्वाकडे बघण्याची दिव्यदृष्टी त्याला प्राप्त होते. 


!! हे विश्वाची माझे घर !! ऐसी माती ज्याची स्थिर !!

     !! किंबहुना चराचर !! आपण झाला !!


ज्ञानदेवाने या लहानशा ओवीत आपली देवाविषयीची संकल्पना सांगितलेली आहे. या विश्वव्यापक देवाची भक्ती करायची तर भक्तानेही विश्वव्यापक व्हायला हवे.  कारण त्याशिवाय त्याला परमेश्वराचे खरे स्वरूप कळणार नाही. माणसाचे आयुष्य हे त्याला मिळालेला एक अनमोल ठेवा आहे. 


सोन्यासारख्या आयुष्याचा नाश करू नका, सुख आपल्या दारात उभे आहे त्याला पारखे होऊ नका व दुःखाला आमंत्रण देऊ नका. या सर्व गोष्टींचा अर्थ एकच कि आचार, विचार, आहार आणि विहार हा मंत्र विसरू नका. आज इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, इंटरनेट, ई-मेल, टीव्ही, मोबाईल या माध्यमामुळे जग जवळ आले आहे, मात्र मनुष्य एकमेकांपासून दूर जात चालला आहे. नवीन पिढी चपळ आहे, चंचल आहे आणि व्यसनाधीन सुद्धा. व्यसनासाठी कुठल्याही मार्गाने जाण्याची त्यांची तयारी असते आणि अध्यात्मच यातून तारू शकते. 


सर्वप्रथम आपण आपल्यावर (स्वतःवर) प्रेम करायला शिका. आपल्या मुलांवर, कुटुंबावर प्रेम करायला शिका. सभोवतालच्या जगावर, सृष्टीवर प्रेम करायला शिका म्हणजे हे जग, हे विश्व आपले वाटू लागेल त्यात दडलेला विठ्ठल तुम्हाला दिसू लागेल त्याच्या सर्वांगसुंदर रुपाला पाहून तुम्हाला आनंद मिळेल. 

                                             -बबनराव पाचपुते

                                             -राज्याचे वनमंत्री

                                             -०५-०५-२००८ 

(हा लेख एका वर्तमान पत्रामध्ये श्री. बबनराव पाचपुते यांनी प्रसिद्ध केला होता. हे त्यांचे मनोगत असून त्यावेळी ते राज्याचे वनमंत्री होते आणि हा लेख खूप जुना आहे. )