Sunday 15 May 2022

लक्ष्मी देवीचा श्राप आणि आळस व कंटाळा यांची एक रंजक कथा

 

कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का..? कि आपल्याला कधी कधी कामाचा, काहीही न करण्याचा खूप कंटाळा आणि आळस येतो. काहीही आणि कोणतेही काम करावेसे वाटत नाही. Life becomes  boaring. पण हे आळस आणि कंटाळा नक्की कोण आहेत. ते कसे दिसतात यांचा काही कुठे उल्लेख आहे का... तर या संदर्भात माज्या पप्पांनी त्यांच्या एका जुन्या वहिती १९९५ साली लिहिलेली एक मजेशीर फार फार जुनी अशी दंत कथा माज्या हल्ली वाचनात आली ती मी येथे आपल्याला ही वाचण्याची संधी देत आहे.  


खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे अपराजित नावाचा एक असूर होता. तो अतिशय पराक्रमी होता. कुणीही त्याला पराजित करू शकणार नाही असा वर त्यान प्रत्यक्ष भगवान शंकराकडून मिळवला होता. आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यानं पृथ्वी तर जिंकलीच, पण लवकरच त्याच लक्ष स्वर्गाकडे वळलं. आता त्याला स्वर्गाचं राज्यही हवंस वाटू लागलं. त्याला देवांचा राजा बनायच होत. 


स्वर्गावर वारंवार हल्ले चढवायला त्यानं सुरुवात केली. भगवान शंकराच्या वरामुळे अजिंक्य बनलेला तो राक्षस देवांना वरचढ ठरू लागला. शेवटी सारे देवगण श्रीविष्णूकडे आले. 


"देवाधिदेव, अपराजित राक्षसानं आमच जगण कठीण केलं आहे. भगवान शंकराच्या वरामुळे तो अजिंक्य ठरला आहे." सर्व देव म्हणाले, "त्याचा ताबडतोब काहीतरी बंदोबस्त करायला हवा, नाहीतर उद्या तो येथे विष्णुलोकावर चढाई करायलासुद्धा कमी करणार नाही." नारदमुनी म्हणाले. 


भगवान विष्णू झोपेतून नुकतेच जागे झाले होते. अजूनही त्यांच्यावर निद्रादेवीचा अमल होता. त्यांनी एक भली थोरली जांभई दिली आणि......... 


                त्या जांभईमधून दोन चमत्कारिक प्राणी बाहेर पडले. अगदी काळाकुट्ट रंग, फताडे पाय, बटबटीत डोळे आणि अतिशय गरीब भित्रा चेहरा !. 


"हे दोघ अपराजित राक्षसावर विजय मिळवतील." श्रीविष्णू म्हणाले. " तुमचं संकट हे दूर करतील." 


"हे दोघे ? हे अशक्त आणि विचित्र प्राणी ? अपराजित राक्षसावर विजय मिळवणार ?" देवांनी आश्चर्यान विचारलं, कोण आहेत हे ?''


   "आळस आणि कंटाळा !" भगवान विष्णूंनी हसत उत्तर दिले. " तुमची शस्त्र, अस्त्र, शौर्य, जे करू शकणार नाहीत ते हे दोघ नक्कीच करू शकतील."



   दोघांनी भगवान विष्णूंना नमस्कार केला. " भगवान आमचं हे रूप.. काळा रंग, बटबटीत डोळे, फताडे पाय... यांच्यामुळे राक्षसगण आम्हास जवळ करणार नाहीत."आळस म्हणाला. 


   " तथास्तु ! तुम्हाला सुंदर रूप मिळेल इतकेच नव्हे. तर तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही अदृश्य देखील होऊ शकाल. जा. यशस्वी होऊन या !" भगवान विष्णूंनी त्यांना वरदान दिले.


अतिशय देखणं रूप मिळालेले आळस आणि कंटाळा हळूच राक्षस सेनेत शिरले. त्यांच्या रूपावर, गोड बोलण्यावर बेहद्द खूष झालेले सैनिक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागले. 


"तुम्ही काम करू नका !" आळस म्हणे. " काम करून काय मिळणार आहे ? शरीराला त्रास फक्त."


कंटाळा म्हणे, " आमच्याकडे बघा आम्ही कसे सुंदर आहोत ! गोरापान रंग ! सुंदर डोळे, कुरळे, काळेभोर केस ! तुमच्यासारख उन्हातान्हात फिरत असतो तर आम्ही काळे, आक्राळ, विक्राळ झालो असतो. तुम्हीसुद्धा आराम करा, आरामानं शरीर सुखी आणि सुंदर बनतं."


सारी राक्षस सेना हळूहळू आळस आणि कंटाळा यांच्या नादी लागली. त्यांच गोड गोड बोलणं त्यांना ऐकायला आवडे, फार काय प्रत्यक्ष अपराजित राक्षसाने बोलावलं तरी ते सांगत, "आता नको, नंतर येऊ, आमच्याकडं आळस आलाय आणि कंटाळापण आलाय."


अपराजित राक्षसाला या गोष्टीच आश्चर्य वाटू लागलं, प्रत्यक्ष राजाची आज्ञा पाळायला दुर्लक्ष करतात हे सैनिक ? केवळ त्या दोघांमुळे ? कोण आहेत हे आळस आणि कंटाळा ?


"आळस आणि कंटाळा यांना बोलावून आणा !" अपराजित राक्षसानं हुकूम दिला. ते दोघेही राक्षस राजासमोर हजर झाले. त्यांना पाहून, त्यांच बोलणं ऐकून राजा इतका खूष झाला, कि त्यान त्यांना आमच्या आमच्या महालात ठेवून घेतलं. 


      लवकरच राक्षस सेनेत आळस आणि कंटाळ्यानं धुमाकूळ घातला. आळसामुळं कुणी काहीही करेनासं झालं, कंटाळ्यानं तर सगळ्यांनाच आपल्या ताब्यात घेतलं, शस्त्र, अस्त्र, गंजली, लढाई करायचंसुद्धा सैनिक विसरून गेल. आणि अचानक देवसेनेने हल्ला चढवला, अपराजित राक्षस राजाला देवसेनेने बंदी बनवलं. देवलोकांवरच संकट दूर झालं. सर्वत्र आनंदीआनंद झाला. आळस आणि कंटाळा यांनी जी कामगिरी केली होती त्याचे सर्वत्र कौतुक होऊ लागल. 


      पण याचा परिणाम उलटाच झाला. आळस आणि कंटाळा स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. जी गोष्ट देवांना जमली नाही ती आपण केली याचा त्यांना गर्व झाला. आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतोअसं त्यांना वाटू लागलं. आपण खरं म्हणजे देवाहुनही श्रेष्ठ आहोत असा त्यांचा समज झाला. 


    " हे देव अमृत पितात. त्यामुळे ते अमर झाले आहेत. आपणही अमृत प्यायला हवं, आपल्यालाही अमरत्व मिळेल. मग आपल्याला कोणीही काहीही करू शकणार नाही." आळस म्हणाला. 


     "पण आपल्याला अमृत मिळणार कसं ? ते तर देवी लक्ष्मीच्या ताब्यात असत." कंटाळा म्हणाला. " 


     "अं, त्यात काय आपल्याला अदृश्य पण होता येत. आपण अदृश्य राहून अमृत पिऊया .... !" आळस म्हणाला.  


     आणि दोघेही लक्ष्मीदेवीच्या महालात शिरले, अमृत कलशामधून अमृत काढून दोघेही अमृत पिऊ लागले. त्याच क्षणी देवीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. 


     "कोण आहे ते अमृत कलशापाशी तिन विचारलं.. ?

  

    दोघांनीही उत्तर दिले नाही, कि ते प्रकटही झाले नाहीत. 


   क्षणातच देवी लक्ष्मीनं त्यांना ओळखलं. " आळस आणि कंटाळा मी तुम्हा दोघांनाही ओळखलं आहे ताबडतोब प्रकट व्हा !" ती म्हणाली. 


 तरीही दोघंजण अदृश्यच राहिले. तास देवीचा संताप वाढला. " प्रत्यक्ष माज्या ताब्यात असलेल्या अमृत कलशातील अमृत तुम्ही प्यायलात. मी दिलेली आज्ञा तुम्ही पाळली नाहीत." देवी संतापानं म्हणाली. " यानंतर तुम्ही स्वर्गलोकात राहू शकणार नाहीतआणि यापुढं तुम्हाला कधीही दृश्य स्वरूपात येत येणार नाही. तुम्ही कायम अदृश्य रहाल." असा देवीने त्यांना शाप दिला. 

  

    आणि आळस आणि व कंटाळा मानवलोकात पृथ्वीवर आले. अमृत प्यायल्यामुळे ते अमर झाले आहेत खरे पण त्या अमरत्वाचा त्यांना काहीही उपयोग झाला नाही ते कोणालाही दिसूच शकत नाहीत. 


मात्र जिथं आळस आणि कंटाळा असतील तेथे देवी लक्ष्मी त्यांना बरोबर ओळखते आणि जिथं ते दोघे असतील त्या घरातून ती बाहेर पडते. आळस व कंटाळा मात्र लक्ष्मीला शोधत घराघरात हिंडत आहेत. त्यांना वाटत कधीतरी ती आपल्याला क्षमा करेल आणि आपण दृश्य स्वरूपात येऊ. 


 पण लक्ष्मीनं स्पष्टच सांगितलं आहे, " आळस आणि कंटाळा यांना क्षमा नाही. जिथं ते आहेत तिथं मी नाही." 


                                 "समाप्त"  

                                                                        - भालचंद्र केशव जगताप (माझे बाबा)

                                                                                                     १२.०२.१९९५

No comments:

Post a Comment