विचार - सकारात्मक, आचार (आचरण) - शुद्ध, आहार - सात्विक व विहार
सत्संग (चांगल्या लोकांची संगत) या चार गोष्टी जर माणसाने आचरणात आणल्या, तर त्याच जीवन आनंदी होईल.
पण हे वाटत तेवढं सोपं नाही आणि हे जर सोपं करायचं असेल तर आपण थोर संतांनी
दाखवलेला मार्ग स्वीकारला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मनिष्ठेला
अग्रस्थान दिले आहे. त्यासाठी तुम्हाला बुद्धीचा वापर करणे अग्रेसर आहे.
बुद्धी हे आत्मा व जीव यांच्यातील दुवा आहे. सुख-दुःख, पाप-पुण्य, खरे-खोटे, यांचा निवडा करणे हे बुद्धीचे काम आहे म्हणून आपण परमेश्वराला नेहमी म्हणत असतो
" देवा मला सद्बुद्धी दे "
बुद्धी, मन आणि शरीर एकरूप झाल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही. मन हे चंचल असते ते कुठे वाहत जाईल ते सांगता येणार नाही, म्हणून त्याला सन्मार्गाकडे वळविले पाहिजे. बुद्धीच्या स्थैर्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. भक्ती ही अंतःकरणापासून केली पाहिजे. भजन-पूजन कितीही केले पण जर त्याला अध्यात्माची जोड नसेल तर ते वायफळ जाते. अध्यात्मामुळे मनुष्याच्या कर्माला डोळसपणा येतो त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते. तो मायाजालातून मुक्त होतो आणि परमेश्वराला एकरूप होतो.
ज्ञान आणि भक्ती कशी आत्मसात करावी हे ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायात स्पष्ट केले आहे. ज्ञानाची लक्षणे ज्ञात झाली कि, मन परमेश्वर चरणी आपोआप लीन होते. तो नामस्मरणात रमतो त्याला परमेश्वर प्राप्ती चा सुलभ मार्ग सापडतो. त्यासाठी हिमालयात तप करायची गरज नाही किंवा चारधाम यात्रा करण्याची गरज भासत नाही, त्याला एकाच ओढ असते ती पंढरपुरची :
!! जेव्हा नसते चराचर !! तेव्हा होते पंढरपूर !!
!! जेव्हा नव्हत्या गंगा यमुना !! तेव्हा होती चंद्रभागा !!
हरिनामाच्या उच्चारामुळे जे पुण्य लाभते त्याची गणना होत नाही. त्याच्या दारात क्षणभर जरी उभे राहिलात तरी त्याला मुक्ती मिळते.
!! देवाचिये दारी उभा क्षणभरी !! तेणे मुक्तिचारी साधिलिया !!
!! हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी !!
!! असोनी संसारी जीव्हे वेगु करी !! वेदशास्त्र उभारी बाह्य सदा !!
!! ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणे !! द्वारकेचे राणे पांडवां घरी !!
नामस्मरण हे भक्ती करण्याचे सोपे साधन आहे; कारण नामस्मरण हे नित्य कर्म साधताना साधता येते. त्याला वेळ व काळाचे नियम नाहीत. त्यासाठी तासंतास मंदिरात बसावे लागत नाही, पण याचा अर्थ असा होत नाही कि मंदिरात जाऊच नये. मंदिरात आरती, भजन, कीर्तन असे उपक्रम चालूच असतात. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. मनाचा चंचलपणा कमी होऊ लागतो. काम - क्रोध - लोभापासून ते दूर जाऊ लागते. सर्व व्यसनांना ते दूर लोटते आणि याचा परिणाम निश्चितच शरीरावर होतो. माणसात बदल होऊ लागतो. सर्वांविषयी मनात प्रेमभावना निर्माण होते. समाजात प्रतिष्ठा लाभू लागते. सत्संगामुळे आणि वाचनामुळे बुद्धी वृद्धिगंत होते. तिचा विस्तार आकाशाएवढा होतो आणि विचार करणायचा दृष्टीकोनच बदलून जातो, सृष्टीचे खरे सौदंर्य जे आधी कधी पाहू शकत नव्हता ते पाहू शकतो विश्वाकडे बघण्याची दिव्यदृष्टी त्याला प्राप्त होते.
!! हे विश्वाची माझे घर !! ऐसी माती ज्याची स्थिर !!
!! किंबहुना चराचर !! आपण झाला !!
ज्ञानदेवाने या लहानशा ओवीत आपली देवाविषयीची संकल्पना सांगितलेली आहे. या विश्वव्यापक देवाची भक्ती करायची तर भक्तानेही विश्वव्यापक व्हायला हवे. कारण त्याशिवाय त्याला परमेश्वराचे खरे स्वरूप कळणार नाही. माणसाचे आयुष्य हे त्याला मिळालेला एक अनमोल ठेवा आहे.
सोन्यासारख्या आयुष्याचा नाश करू नका, सुख आपल्या दारात उभे आहे त्याला पारखे होऊ नका व दुःखाला आमंत्रण देऊ नका. या सर्व गोष्टींचा अर्थ एकच कि आचार, विचार, आहार आणि विहार हा मंत्र विसरू नका. आज इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, इंटरनेट, ई-मेल, टीव्ही, मोबाईल या माध्यमामुळे जग जवळ आले आहे, मात्र मनुष्य एकमेकांपासून दूर जात चालला आहे. नवीन पिढी चपळ आहे, चंचल आहे आणि व्यसनाधीन सुद्धा. व्यसनासाठी कुठल्याही मार्गाने जाण्याची त्यांची तयारी असते आणि अध्यात्मच यातून तारू शकते.
सर्वप्रथम आपण आपल्यावर (स्वतःवर) प्रेम करायला शिका. आपल्या मुलांवर, कुटुंबावर प्रेम करायला शिका. सभोवतालच्या जगावर, सृष्टीवर प्रेम करायला शिका म्हणजे हे जग, हे विश्व आपले वाटू लागेल त्यात दडलेला विठ्ठल तुम्हाला दिसू लागेल त्याच्या सर्वांगसुंदर रुपाला पाहून तुम्हाला आनंद मिळेल.
-बबनराव पाचपुते
-राज्याचे वनमंत्री
-०५-०५-२००८
(हा लेख एका वर्तमान पत्रामध्ये श्री. बबनराव पाचपुते यांनी प्रसिद्ध केला होता. हे त्यांचे मनोगत असून त्यावेळी ते राज्याचे वनमंत्री होते आणि हा लेख खूप जुना आहे. )
No comments:
Post a Comment