Thursday, 30 July 2020

गोष्ट सहनशीलता आणि सहिष्णुतेची


गोष्ट सहनशीलता आणि सहिष्णुतेची

मस्त गोष्ट आहे कदाचित तुमच्या ऐकण्यात किंवा वाचनात आली असेल...




एका बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले. अपेक्षा होती की बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल.

पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले.

जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले, आतातरी बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले. पण तसे काही घडेना

शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला.

तुम्हाला वाटेल की बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला.

पण तसे नव्हते...!!!



पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान ऍडजेस्ट करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे.

कारण बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते. बेडकाला कोमट पाण्यात टाकल्यावर बेडकाने आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानाप्रमाणे ऍडजेस्ट करायला सुरवात केली.

पुढे जस जसे पाण्याचे तापमान वाढू लागले बेडकाने तोच प्रयोग चालु ठेवला. पण यामध्ये बेडकाची बरीच ताकद खर्च झाली.

ज्यावेळी पाणी उकळू लागले व बेडकावर टुणकन उडी मारून पाण्याबाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही.

त्यामुळे बेडकावर मरण ओढवले. जर ज्या वेळी ताकद होती त्यावेळी बेडूक उडी मारून बाहेर पडला असता तर नक्कीच वाचला असता.

आपले पण असेच असते. आपण अनेकवेळा संकटे, अडथळे, अडचणी, दुःख, उदासीनता, स्वप्नभंग, निराशा यामूळे वेढले गेलेलो असतो. तसेच आपल्याला पुष्कळवेळा आपल्याला कमी लेखणारी, आपला अपमान करणारी, आपले शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करणारी माणसे भेटत असतात.

अशा परिस्थितीला व माणसांना तोंड देण्यासाठी निसर्गाने आपल्याला एक आगळी वेगळी शक्ती बहाल केली आहे. ती म्हणजे सोशीकता, सहन करण्याची ताकद किंवा सहिष्णुता. आपण नेहमीच आलेल्या परिस्थितीला ऍडजेस्ट व्हायचा प्रयत्न करत असतो.

उगीच कशाला वाकड्यात शिरायचे...; म्हणून आपल्याला जी वेडी- वाकडी माणसे भेटत असतात, त्यांच्याशी पण आपण ऍडजेस्ट करायचा प्रयत्न करत असतो.

खरे म्हणजे यातून लवकर सुटका कशी करून घेता येईल याचे मार्ग आपल्याला दिसत असतात व समजत पण असतात. पण सहिष्णुतेच्या नावाखाली आपण याकडे दुर्लक्ष करत असतो.

पण यामध्ये आपली बरीच ताकद खर्च होत असते हे आपल्याला कळत नसते. पण जेव्हा डोक्यावरून पाणी वाहू लागते व यातून आपली सुटका करून घेण्याची वेळ येते तेव्हा सुटका करून घेण्यासाठी लागणारी ‘एनर्जी’ च आपल्याकडे शिल्लक रहात नाही.

आपण मग त्यात कायमचे अडकून पडतो व "दैवाला" दोष देण्यापलीकडे फारसे काही करू शकत नाही.

सहनशिलता किंवा सहिष्णुता हा चांगला गुण आहे पण त्याचा अतीरेक झाला तर तो दुर्गुणच ठरतो.

गुणांचे सद्गुण व दर्गुण असे दोन प्रकार आहेत. पण अनेक वेळा दुर्गुण हे सद्गुण ठरत असतात; तर सद्गुण हे दुर्गुण ठरत असतात.

तुम्ही कोणालाही तुमचे शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करू देऊ नका.

पाणी गरम होत असताना जोपर्यंत आपल्याकडे उडी मारून बाहेर पडण्याची ताकद आहे तोपर्यंत उडी मारून बाहेर पडणे शहाणपणाचे ठरते.

तात्पर्य : तुमच्याकडे असलेल्या सहनशीलतेचा किंवा सहिष्णुतेचा उपयोग कसा करायचा हे तुमचे तुम्हीच ठरवायचे

कावळ्याची गोष्ट माणुसकी शिकवणारी


कावळ्याची गोष्ट माणुसकी शिकवणारी




सुंदर बोधकथा आहे,

आवडल्यास
इतरांनाही सांगावी अशी .....

एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.
कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन
पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही.बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"

वडील कावळा म्हणाला "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू
लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे.
वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे
तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल." मुलगा कावळा "होय" म्हणाला.
त्यानंतर वडील कावळ्याने
मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात
घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला,
तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस
आणले आहे. असले खाणे मला नको."
वडील कावळा म्हणाला, "थांब,
तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग
तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ. तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते
सुद्धा माणसाचे."
मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ?
पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून
आकाशात उडाला आणि त्याने
तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.

मग तो झाडावर येवून बसला.
वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"

थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.

फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत
होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.

आमच्या धर्माचा अपमान
झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात
होते.

खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे
होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा..

गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.
या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.
आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते.

कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला,
"बाबा, हे असेच नेहमी होते का?
आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"

कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."
इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून
गेले.